'तुमचं आमचं सेम असतं '
- vidula consultancy
- Jan 24, 2019
- 2 min read
Updated: Feb 12, 2019
By Purva Joshi

प्रेम ही वर्षानुवर्षे सर्व कवी, साहित्यकार, शिल्पकार आणि मुख रसिकश्रोत्यांना आकर्षित करणारी भावना आहे. हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीमधले बरेचसे चित्रपटही याच भावनेवर आधारित आहेत. प्रेम हे विविध पैलुंने नटलेले असू शकते. आई-मुलाचे प्रेम, भाव-बहिणीचे प्रेम व मित्र मैत्रिणीचे प्रेम. परंतु जेव्हा हीच भावना दोन समलिंगाच्या व्यक्तींकडून एकमेकांसाठी व्यक्त होते तेव्हा त्यासाठी एवढी प्रश्नचिन्हे कशासाठी उभी राहतात? म्हणजे उदाहरणच घ्यायचा झाला तर शीतल आणि सुहास एकमेकांवर प्रेम करतात. आता या दोघी जर मुली असतील, अथवा दोघंही मुले असतील तर त्यांच्या प्रेमामध्ये आणि दोन भिन्न लिंगी व्यक्तींच्या प्रेमामध्ये अनुभवात्मक पातळीवर कसा आणि कितीसा फरक असेल?
मुळात प्रेमाची व्याख्या करणेच खूप अवघड. त्याला जातीचा, भाषेच, वयाच बंधन नसावा असे खूप विचारवंत म्हणतात. तसेच लिंगाचे बंधन तरी कशासाठी? प्रेमाच्या भावनेशी अशी तुलना कारणाऱ्यांबद्दल खरंच कुतूहल वाटतं. भिन्नलिंगी प्रेम श्रेष्ठ, समलिंगी कनिष्ठ, असे मोजमाप आपण कोणत्या आधारावर करतो याचा विचार करण्याची नक्कीच गरज आहे.
समाजातील काही घटकांचे असेही मत आहे कि समलैंगिक संबंध हे अनैसर्गिक आहेत. निसर्गाच्या विरोधात आहेत. आज निसर्गातही अनेक रोपांचे, प्रजातींचे अनैसर्गिकरित्या मानवाच्या उपयोगासाठी मिलन केले जाते. ते आपण वैज्ञानिक दृष्टीने मान्य करतो. तर्क लावतो. मग भावना व समलिंगत्व समजून घ्यायचा , त्याबद्दल अभ्यास करायचा आपण कितीसा प्रयत्न केला आहे. त्याच तार्किक बुद्धीने आपण म्हणतो , टेस्ट ट्यूब बेबी ने आपत्य होण्याचा आनंद योग्य, परंतु समलिंगत्व? छे! छे! ते अयोग्य! काही अभ्यासक समलिंगत्यावाचा अभ्यास करून काही शोधनिबंधात असेही म्हणतात समलिंगत्व हे निसर्गाचेच उत्क्रांतीच्या दिशेने पुढचे पाऊल आहे. सध्याची वाढती लोकसंख्येस नियंत्रणाखाली आणण्यासाठी ही निसर्गाची पद्धत आहे.
मानसशास्र म्हणते कोणतेही वर्तन , विचार किंवा भावना समाजासाठी अथवा स्वतःसाठी घातक असेल तर ते असामान्य, समाजाच्या प्रवाहाविरुद्ध ठरते. केवळ समलिंगी असणे, त्याविषयी उत्सुकता असणे हे कोणत्याही मानसिक आजाराचे लक्षण नाही अथवा त्याने तसा धोकाही संभाव्य नाही. मानसोपचारतज्ञ म्हणून आम्ही या लोकांच्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांची होणारी घुसमट , वर्षांनुवर्षे दाटलेले दुःख, समाजाबद्दलची भिती , क्वचित द्वेष या सर्वांचे ओझे घेऊन ते अक्षरशः आपल्या आयुष्याला ढकलत असतात. जणू एखाद्या कैद्याला साखळीत जखडून उर्वरित आयुष्य काढायला सांगतात, त्याप्रमाणे समाजाचे पाश उराशी बांधून हे लोक आपली वाटचाल करत असतात.
त्यांना गरज असते ती केवळ आपण त्यांचा स्वीकार करण्याची. त्यांच्या अपराधी भावनेवर आपली प्रेमाची फुंकर त्यांना खूप दिलासा देऊन जाते. आपण ऍबनॉर्मल नाही , मलाही कोणी समजून घेऊ शकते हा विचार त्यांची स्व- प्रतिमा उंचावण्यास मदत करतो. मग एक 'भावनाप्रधान व्यक्ती' म्हणून त्यांची तळमळ समजून घेणे हि आपली जबाबदारी नाही का? समलिंगींच्या प्रेमाला अघोरी गुन्याचा दर्जा आपण विचार ना करता किती दिवस देणार आहोत हे तपासण्याची वेळ अली आहे. शेवटी कवींनी सुद्धा 'खोल' अर्थ लक्षात घेऊनच म्हणाले असेल , ' प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमच, आमचं, 'समलिंगीच' ही सेम असतं ..!'




Comments