SCHIZOPHRENIA आणि माझा अनुभव
- vidula consultancy
- May 25, 2020
- 2 min read
Updated: May 25, 2020

लग्न होऊन मी घरात आले. घराची परिस्थिती बेताची. घरातली माणसं, आनंदी वातावरण सर्व छान होते. पण घरातच स्कीझोफ्रेनिया चा मनोरुग्ण Patient होता . त्यामुळे मला सुरुवातीला थोडी भीती वाटायची. टेन्शन यायचे. काही काळानंतर मला त्याची थोडी सवय होत गेली. घरच्यांनी मला त्याच्या आजाराची कल्पना दिली होती पण समजायला थोडे अवघड जायचे. थोडे दिवसांनी मला त्याचा स्वभाव त्याच्या आजाराची लक्षणे लक्षात येत गेली.
माझे लग्न झाले त्यावेळी तो खासगी नोकरी करत होता. माझे लग्न झाल्यावर तो मला "तुम्ही माझी बहीण आहेत व मी तुमचा भाऊ आहे" असे म्हणायचा. पुढे पुढे त्याने नोकरी सोडून दिली. त्याला स्वतःच्या तब्येतीमुळे तेथील छोटी मोठी कामे ही होत नव्हती. कामाच्या ठिकाणी कोणी त्याची चेष्टा केली त्याला कोणी काही बोलले की निघून घरी यायचा आणि म्हणायचा मी कामाला जाणार नाही. नंतर तो घरीच राहायला लागला. त्याला कोणी कमी लेखले किंवा कोणी वाईट वागणूक दिली की तो खूप चिडायचा.
त्याच्या मनात जर एखाद्या विषयी किंवा नातेवाईकांविषयी राग गैरसमज असेल व तो माणूस घरी आला तर तो त्या माणसाशी एखादा जुना घडलेला प्रसंग आठवून खूप ओरडायचा, चिडायचा व त्या माणसाला खूप बोलायचा. कधी कधी अंगावर धावून जायचा. त्या माणसाकडे एकटक सारखे बघत राहायचा. अशा वेळी मला खूप भीती वाटायची व त्रास व्हायचा. असे वाटायचे घरी कोणी येऊच नये. कधी कधी वाटायचे या लोकांना स्वार्थाच्या गोष्टी कशा कळतात. म्हणायचा "मी काम करतो पण मला पैसे किती देणार?" उदा. दळण आणणे , दूध आणणे . त्याला असे कामाचे पैसे दिले की ते साठवून कोणाला तरी नेऊन देणार व त्यांना म्हणणार "मी तुम्हाला १०० रुपये देतो मला महिन्याला ५ रुपये व्याज द्या " असेही काही उद्योग करत.
कधी कधी विचाराच्या नादात न सांगता ३०-४० किलोमीटर चालत नातेवाईकांकडे जायचा. मग त्याला शोधण्यासाठी खूप फिरावे लागायचे. हे करताना घरातल्या सगळ्यांनाच खूप त्रास व्हायचा. तो कोठे गेला असेल कधी परत येईल म्हणून सगळ्यांना काळजी वाटायची. झोपेच्या वेळी घरात आत बाहेर करणे, पाऊस ऊन याचा अंदाज न घेता बाहेर पडणे हे सतत असायचेच. कधी कधी कळायचे नाही काय करावे. कधी कधी तो म्हणायचे मी मुद्दाम असे करत नाही माझी तब्येतच तशी आहे तर मी काय करू. मला म्हणायचं चूक झाली माफ करा. अशा वेळी मला खूप वाईट वाटायचे. त्याला change म्हणून trip ला ही न्यायचो पण तिथेही तो रमायचा नाही. एका जागी बसणं पसंत करायचा.
त्याला डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती. गोळ्या चालू होत्या. एखाद्या वेळेस त्यांना गोळ्या नको असल्या की तो गोळ्या फेकून देत व "मी वेडा नाही मी गोळ्या घेणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा " असे म्हणत. नंतर त्यांना समजावून सांगितलं की मात्र ते गोळ्या घ्यायचे. या सर्वात मात्र मला माझ्या घरच्यांच पाठबळ होत.
अशा लोकांना सांभायला संस्था ही असतात हे आम्हाला उशिरा कळले पण त्यांना वाटायला तरच हे तितेच राहतात. त्याचबरोबर आर्थिक पाठबळ हा ही महत्वाचं प्रश्न असतो. अशा लोकांशी प्रेमाने, आपुलकीने वागले तर आपल्याशीही ते खूप चांगले वागतात. परंतु या रोग बद्दल मुळात सामान्य लोकांना फार माहिती नाहीए. या लोकांना कसे सांभाळावे याचा काही Guidance नाहीए. म्हणून याविषयी जास्तीतजास्त जागरुकता असणं गरजेचे आहे. त्याचबरोबर मला असेही वाटते की समाजाने पण अशा लोकांना वाईट वागणूक न देता, तिरस्कार न करता त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे. त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न!
-आशा जोशी, पुणे




Comments