Corona and Mental Wellness
- vidula consultancy
- Oct 15, 2020
- 3 min read

कोरोना आणि मानसिक स्वास्थ्य
सध्या कोरोनाचे सावट सगळ्या जगावर आहे. कुणीही यातून सुटलेलं नाही. अनिश्चिततेने सगळं वातावरण झाकोळून टाकले आहे. सगळ्यात मोठी भीती मनात आहे ती म्हणजे आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली तर? परत त्यांची भेट कधी होईल? शिवाय मृत्युदराचे आकडे, इ. अनेक शंका-कुशंका घेऊन आपण सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चिंताग्रस्त आहोत. इतक्या नकारात्मक वातावरणात आपलं मन:स्वास्थ्य (मानसिक स्वास्थ्य) कसं राखायचं, हा आपल्यासमोर एक मोठाच प्रश्न आहे आणि अर्थात गरजही.
आता अर्थातच आपण काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर नक्कीच आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्याची मदत होईल. त्या बघुयात-
१. परिस्थितीचा स्वीकार करणे. अनेक गोष्टी आपल्या हातात नाहीत पण काही गोष्टी नक्कीच आपल्या हातात आहेत, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींचा विचार करून खरंतर काहीच निष्पन्न होत नाही पण चिंता, भय, अगतिकता ह्या भावना सतत प्रमाणाबाहेर डोकं वर काढतात.
२. टीव्ही चॅनल्स, वृत्तपत्र आणि इतर माध्यमांमधून कोरोनाविषयी मिळणाऱ्या बातम्या कमीतकमी बघाव्यात किंवा दिवसातला एक वेळ त्यासाठी निश्चित करावा. आधीच नकारात्मक, तणावपूर्ण वातावरणात आपण असल्यामुळे ह्या बातम्या, त्यावरची चर्चा आपली anxiety वाढवते आणि त्याच त्याच गोष्टींची उजळणी होते (जे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितकारक नाही). त्यामुळे ते टाळले पाहिजे.
३. आजूबाजूला घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींची मनात जाणीवपूर्वक नोंद केली पाहिजे (अनेकदा वाईट गोष्टींबरोबर चांगल्या घटनाही घडताहेत त्याची नोंद घ्यायची राहून जाते). भूतकाळातील चांगल्या घटना, अनुभव आठवून त्याचा पुन:प्रत्यय घेतला तर आनंदी राहायला आणि ह्या सगळ्या परिस्थीतीशी लढण्याचे बळ मिळेल.
४. लक्ष विचलित करणे- सगळ्या परिस्थितीपासून थोडं लक्ष विचलित करून इतर गोष्टींकडे वळवलं उदाहरणार्थ आपले छंद जोपासणे, नवीन छंद शोधणे आणि रुजवणे, नवीन चांगल्या सवयी लावणे, निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रयत्न करणे, जवळच्या माणसांच्या संपर्कात राहणे (सध्या बरचसं काम स्क्रीनवर असल्यामुले जर फोन वर बोलण्याचा कंटाळा येत असेल तर पत्र लिहून त्याचा फोटो पाठवू शकतो).
५. योग, प्राणायाम, शारीरिक व्यायाम हे नियमितपणे करणे आवश्यक आहे.
६. नकारात्मकच घडेल असे गृहीत न धरता स्वतःची काळजी घेत राहणे.
ह्या सर्व गोष्टी केल्या तर त्याचा फायदा फक्त आत्ताच्या परिस्थितीपुरताच नाही तर आयुष्यभरासाठी होईल. ही जर आपली जीवनशैलीच बनली तर कोरोना काळानंतर आपण खूप evolved आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ होऊन बाहेर येऊ.
खरंतर कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकण्याची संधीच उपलब्ध करून दिली आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता बघूया काय-काय शिकण्याची संधी या संकटकाळाने आपल्याला दिली आहे-
१. आयुष्यातील अनिश्चिततेशी कसे जुळवून घ्यायचे, हे शिकण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
२. प्रत्येक गोष्टीचा समतोल कसा साधायचा, हे आजमावून बघता येत आहे. कारण प्रत्येक उपायाचे काही फायदे- तोटे आहे. उदाहरणार्थ- मुलांचे शिक्षण सुरु राहावे ह्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु आहे. हा झाला उपाय. त्याचा फायदा निश्चितच आहे. पण तोटाही आहे. म्हणजे डोळे, कान, मान ह्यांच्याशी संबंधित दुखणी उद्भवताहेत, इंटरनेटचा अतिरेकी वापर वाढतोय, इ. आत आपल्याला जास्तीत जास्त फायदा आणि कमीतकमी नुकसान हवे असेल तर कुठलीही उपाययोजना करताना ती कशी अमलात आणायची, कसा समतोल साधायचा हे शिकण्याची ही संधीच आहे.
३. आत्मपरीक्षण करायला, स्वतःकडे लक्ष द्यायला, स्वतःची काळजी घ्यायला, थोडा आराम करायला, कुटुंबीयांबरोबर सकस वेळ घालवायला, अनेक गोष्टींचा पुनर्विचार करायला, जीवनकौशल्ये शिकायला ही खूप मोठी संधी आहे.
४. सगळ्यात महत्वाचे - रेसिलियन्ट (resilient) होण्यासाठी उपयुक्त वातावरण आहे. रेसिलिअन्स (resilience) म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्याची क्षमता, कितीही अडथळे आले तरी त्यावर मत करून पुन्हा पूर्वपदावर येण्याची क्षमता, जी सगळ्यांनाच अंगी रुजविणे खूप गरजेचे असते. पण ती रुजवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणे आवश्यक आहे, जे आपण सहसा टाळतो किंवा परिस्थिती अनुकूल करण्याच्या मागे धावतो. तसे न करता जर ह्या प्रतिकूल परिस्थितीचा आपण स्वतःला रेसिलियन्ट करण्यासाठी योग्य वापर केला तर नक्कीच आपल्याला मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्याचे प्रशिक्षणच मिळेल.
संत तुकारामांनी एका अभंगात म्हटले आहे, "मस्तकी सहावे टाकियाचे घाव, तेव्हा देवपण भोगावते". हे टाकीचे घाव सोसून प्रगल्भ होण्याची, सोने जसे तावून सुलाखून निघाल्यावर अधिक उजळते तसेच तावून सुलाखून निघण्याची, परिणामी उजळून निघण्याची evolved (उत्क्रांत) होण्याची संधी ह्या कोरोनाने आपल्याला दिली आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीकडे संकट म्हणून न बघता जर संधी म्हणून बघितले तर नक्कीच फायदा होईल आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा.
सौ. वैष्णवी आशिष कुलकर्णी.
मानसशास्त्रज्ञ, विदुला सायकॉलॉजिकल कन्सल्टन्सी, पुणे




Comments