top of page
Search

डिप्रेशन येण्यासारखं झालंय तरी काय ?

  • Writer: vidula consultancy
    vidula consultancy
  • Oct 14, 2021
  • 3 min read

ree


"काही झालं नाहीये तुला. हेसगळं Psychological आहे"., "काहीअर्थ नाही ह्या सगळ्याला", "उगीच negative विचार करू नकोस, रडत बसू नकोस ", "बाहेर पड ह्यातून", "स्ट्रॉंग रहा", "डिप्रेशन येण्यासारखं झालंय तरी काय ?" ओळखीचे वाटताहेत ना हे संवाद ! आपल्या आजूबाजूला जेव्हा मानसिक समस्यांना तोंड देणारे लोक भेटतात, तेव्हा अनेकदा कळत-नकळतपणे असे सल्ले आपण देत असतो. किंवा आपण एखाद्या अवघड मानसिक अवस्थेत असताना लोकांकडून असे संवाद अनेकदा कानावर पडतात.

आता ह्यातला मुख्य मुद्दा म्हणजे जवळजवळ आपल्या सगळ्यांनाच पडणारा प्रश्न- "डिप्रेशन येण्यासारखं झालंय तरी काय ?" किंवा "मानसिक ताण/समस्या येण्याचं कारण काय?" ह्या प्रश्नाचं उत्तर देईनच पण त्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या आणि अशा अनेक वाक्यांमुळे/संवादांमुळे नैराश्यात असणाऱ्या व्यक्तीवर होणारा परिणाम. "डिप्रेशन येण्यासारखं झालंय तरी काय ?" - हा वरकरणी प्रश्न वाटत असला तरी कुठेतरी त्यात मानसिक समस्या उद्भवलेल्या व्यक्तीची स्थिती आणि अनुभव ह्यांना कळत-नकळत नाकारण्याची भूमिका दिसते. त्यामुळे अशी व्यक्ती आपल्या भावना, मानसिक त्रास हे व्यक्त करणंच बंद करते. अनेकदा आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यातसुद्धा नेमकं काय चाललंय, ह्याची आपल्याला पुरेशी कल्पना नसते. एखाद्या व्यक्तीला ताप आला किंवा काही शारीरिक त्रास होत असेल तर आपण त्याला जखम झाली आहे त्याच ठिकाणी चिमटा काढू कां किंवा दुखवू कां ? नाही ना ? मग मानसिक दुखणी किंवा समस्या असलेल्या व्यक्तीशी बोलतानासुद्धा त्याला आपल्या बोलण्याने अजून जखमी करू नये, हे लक्षात घेतले पाहिजे.. त्याचा अनुभव नाकारणे ,त्याला/तिला काही झालंय हे मान्यच न करणे, किंवा या लेखाच्या सुरुवातीला जे संवाद दिले आहेत , त्या पद्धतीने सल्ले देणे (तसा संवाद करणे) ह्यामुळे मानसिक समस्येतून जाणारी व्यक्ती अजून खचते, अनेकदा स्वतःला दोषी ठरवू लागते किंवा कोशात जाते.

अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की मानसिक आजार असणाऱ्या तीनपैकी एका व्यक्तीला Social anxiety असते, समाजात वावरताना भीती वाटते. लोकांच्या मनात मानसिक आरोग्याबद्दल असलेल्या गैरसमजुती हे ह्यामागचं एक मोठं कारण आहे. जसं ताप, सर्दी, खोकला, blood pressure, डायबेटिस यासारखे शारीरिक आजार होतात तसेच डिप्रेशनसारखे मानसिक आजारदेखील होऊ शकतात. त्याचा स्वीकार करणं आणि मानसिक आजार हादेखील इतर आजारांसारखाच एक प्रकार आहे, हे मान्य करणं आवश्यक आहे.

आता खरंतर डिप्रेशन किंवा कुठलाही मानसिक आजार व्हायला अनेक सूक्ष्म घटक कारणीभूत असतात. त्यामुळे ज्याला तो आजार झालाय, त्याला दोष देणं किंवा त्याच्यावर शेरे मारणं चूक आहे. डिप्रेशन बद्दलच बोलायचं तर ती एक आंतरिक मानसिक अवस्था (Internal state of mind) आहे. कुणीही मुद्दाम डिप्रेशन मध्ये जात नाही. कधीकधी मेंदूत झालेल्या रासायनिक बदलांमुळे, अनेकदा आजूबाजूची परिस्थिती बिकट असल्यामुळे आणि अशा असंख्य कारणामुळे डिप्रेशन येऊ शकतं. अनेकदा लौकिकार्थाने सगळं सुरळीत सुरु असणाऱ्या व्यक्तीलाही डिप्रेशन येऊ शकतं. डिप्रेशन येण्यासाठी दरवेळी काहीतरी वाईट किंवा भयानक घटना आयुष्यात घडण्याची गरज नसते. खरंतर जेव्हा काहीतरी वेदनादायक किंवा आघात करणारी घटना घडते आणि त्यानंतर एका विशिष्ट कालावधीत डिप्रेशन येतं त्याला मानसशास्त्रात Adjustment disorder असं म्हणतात. थोडक्यात असं एकाच कारण किंवा कारणांकडे आपण ठामपणे बोट दाखवू शकत नाही.

आज डिप्रेशन चा एक वेगळा पैलू मांडण्याचा प्रयत्न करते. यंदाच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे- “Mental health in unequal world”. "सामाजिक विषमता" हा डिप्रेशन आणि एकूणच मानसिक स्वास्थ्याचा महत्वाचा घटक आहे / कारण आहे. अनेकदा आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि अशा अनेक निकषांवर एखाद्या विशिष्ठ समूहाला आणि त्यांतील व्यक्तींना बाजूला सारलं जातं, exclude केलं जातं, उपेक्षित वागणूक दिली जाते. अशा वंचित आणि उपेक्षित समाज/समूह, त्यातील लोक एकटे पडतात. Social isolation (सामाजिक अलगीकरणाचे) चे काय आणि किती परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतात, ते ह्या कोरोनाकाळात आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. तसेच अनेक परिणाम समाजातील उपेक्षित लोकांना वारंवार भोगावे लागतात. अनेक गैरसमजुती, अंधश्रद्धा, उच्च-नीच भेदभाव आणि stigma अशा कारणांमुळे समाजातील विशिष्ट वर्गाला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. वंश, जातीयवाद, आर्थिक आणि सामाजिक स्थिती, भाषा, Sexual orientation (LGBTQA+) अशा निकषांमुळे आणि त्याबद्दल असलेल्या कर्मठ भूमिकेमुळे अनेक लोकांना वाईट वागणूक, उपेक्षा सहन करावी लागते. दिव्यांग व्यक्ती, अनेक ठिकाणी स्त्रिया, लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, निराधार, अनाथ, स्थलांतरित लोक, HIV/AIDS, कुष्ठरोग, कोड, कॅन्सर, असे काही आजार असणाऱ्या व्यक्ती, मानसिक आजार असणाऱ्या व्यक्ती, अगदी मूल होत नसलेले (वंध्यत्वाच्या समस्या असणारे) जोडपी, ठराविक आणि सामान्य चौकटीपलीकडे जाऊन विचार करणारे, निर्णय घेणारे लोक आणि अशाप्रकारच्या अनेक व्यक्तींना समाजाकडून अवहेलना, उपेक्षा, सहन करावी लागते. ह्या सगळ्याचे एक चक्र तयार होत जाते- उपेक्षा, समाजातून नकार, exclusion, त्यामुळे येणारा एकाकीपणा (loneliness), अगतिकता (helplessness), कोशात जाणे, आत्मसन्मान, आत्मविश्वास कमी होणे आणि ह्या सगळ्याची परिणती डिप्रेशन, आणि इतर मानसिक आजारात होणे. ह्या समाजघटकांपर्यंत त्यामुळे अनेक महत्वाच्या आणि अत्यंत मूलभूत अशा सुविधादेखील पोचत नाही. वंचित/उपेक्षित (marginalized) समाज आणि एकाकीपणा, डिप्रेशन ह्यावर मानसशास्त्रात अनेक प्रकारे संशोधन झाले आहे. समाजातून मिळणाऱ्या प्रतिकूल वातावरणामुळे आणि वागणुकीमुळे अनेकजण social anxiety चेही शिकार बनतात. जागरूकतेच्या अभावी मानसिक आरोग्यसेवादेखील त्यांना सहजपणे उपलब्ध होत नाहीत.

सशक्त समाज हवा असेल तर ही असमानता थांबवण्यासाठी अतिशय जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून अशा लोकांना आपापल्यापरीने मदत करण्याचा आणि ही विषमता दूर करण्याचा संकल्प करूयात. मानसिक आरोग्याशी निगडित सर्व सेवा आणि सुविधा समाजातील उपेक्षित लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मानसोपचार तज्ञ म्हणून आम्ही सातत्याने आणि निष्ठेने काम करत राहू, हा यंदाच्या मानसिक आरोग्य दिनाचा संकल्प. धन्यवाद.

-सौ. वैष्णवीआशिषकुलकर्णी.

मानसशास्त्रज्ञ, विदुलासायकॉलॉजिकलकन्सल्टन्सी, पुणे

 
 
 

Comments


Vidula Psychological Consultancy, Pune
4/41, Parag bungalow, 
Near PNG erandawane shop, and Sahakar baug,
Prakash lagu motiwale path,
behind SBI off karve road,
Erandwane, Pune -411004.

© 2025 by Vidula Psychological Consultancy, Pune

 

bottom of page