top of page
Search

मानसिक स्वास्थ्य:- काळाची गरज

  • Writer: vidula consultancy
    vidula consultancy
  • Oct 10, 2019
  • 3 min read

'सध्या मानसिक समस्या वाढत चालल्या आहेत', 'समुपदेशनाची गरज मोठ्या प्रमाणावर आहॆ', 'आपली जीवनशैली खूप तणावयुक्त आहॆ', 'सोशल मीडियामुळे मुलांच्या समस्या वाढताहेत', 'आपली कौंटुबिक व्यवस्था ढासळत असल्यामुळे मानसिक प्रश्न उद्भवताहेत', ही आणि अशी अनेक वाक्ये आपल्या कानावर सतत येत असतात. पण अनेक वर्षे हि चर्चा आपण करत असलो तरी त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यात आपण कमी पडतोय असं वाटतं . मानसिक स्वास्थ्य, समुपदेशनाची गरज हे थट्टेचे , उपहासाचे

ree
Image courtesy : www.ivoryparke.com

विषय होताना दिसतात . उदा- 'त्याला समुपदेशनाची गरज आहे कारण तो भावनिकदृष्ट्या सक्षम नाहीये' , 'मानसिक आजारांची नावे विशेषण म्हणून एखाद्या व्यक्तीसाठी वापरणे', इत्यादी. ह्या अश्या वाक्यांमुळे मानसिक प्रश्न भेडसावत असणारी व्यक्ती मदत मागायला, आपल्या त्रासदायक भावना व्यक्त करायला घाबरते आणि समस्या वाढतच जातात. भारतासारख्या देशात जिथे माणूस माणसाला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो तिथे खरंतर हे होऊ नये असे वाटते. पण नुकत्याच झालेल्या अभ्यासावरून दिसून येते कि भारतात डिप्रेशनचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. हि आपणा सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. ह्याला अनेक कारणे असली तरी मोकळेपणाने भावना व्यक्त करता न येणे हे कारण नक्कीच मोठे आहे. हे असे कां होते ह्यावरही बरीच चर्चा आपण करतो. उदा- आजूबाजूला बोलायला माणसं नाहीत, आपण विभक्त कुटुंबात राहतो, इत्यादी. हे बऱ्याच अंशी खरा असलं तरी हे एकमेव कारण नक्कीच नाही. अनेकदा ज्या व्यक्तीशी आपण शेअर करतो ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य असतेच असं नाही, त्याला/तिला ह्या समस्या हाताळताना काय बोलावे, काय बोलू नये ह्याची पुरेशी माहिती असतेच अस नाही (उदा- 'मला ह्यापेक्षा जास्त त्रास असूनही मी तुझ्यासारखा/सारखी रडत नाही बसत’, अशा अर्थाची वाक्ये आणि तुलनेमुळे प्रेरणा मिळण्यापेक्षा समस्येला तोंड देत असलेला माणूस अधिकच खचतो आणि स्वतःला दोष देऊ लागतो’), अनेकदा आपला स्वभाव मुळातच खूप संवेदनशील असतो, कधी कधी आत्मकेंद्रित असतो, अनेकदा आजूबाजूची परिस्थिती आपल्यावर हावी होत, काहीतरी गंभीर घटना आयुष्यात घडलेली असू शकते. थोडक्यात, मानसिक समस्यांना अनेक पैलू आणि कारणे असतात. मुक्त संवाद आणि परिस्थितीचा स्वीकार हा यावर उपाय असू शकतो.


आपल्याकडे ह्या समस्या वाढताहेत ह्या धक्क्यातून आणि आश्चर्यातून आपण जोपर्यंत बाहेर पडणार नाही, तोपर्यंत त्यातून मार्ग काढणे अवघड होईल. मानसिक समस्या उद्भवणे हे अतिशय नकारात्मक रीतीने समाजात घेतले जाते. खरंतर आपण सगळेच कधी ना कधी मानसिक समस्यांच्या चक्रातून जात असतो. त्यावर आपापल्यापरीने उपायही शोधत असतो. कधी ते उपाय यशस्वी होतात, कधी होत नाहीत. पण त्यात लाजण्यासारख काहीच नाही. सारखा ताप आला की जितक्या सहजतेने डॉक्टरांकडे जातो तेवढ्याच सहजतेने भावनिक अशक्तपणा आला , सारखं निराश, low वाटू लागलं तर मानसोपचारासाठी मानसशास्त्रज्ञांकडे जायला पाहिजे. एखादी व्यक्ती डिप्रेशनची , मानसिक समस्यांची बळी पडत असेल तर ती त्या व्यक्तीची चूक आहे, अशी धारणा चुकीची आहे. अनेकदा असाही समज होतो की, सगळी सुखं असताना एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये कशी जाऊ शकते? त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ही एक आंतरिक अवस्था आहे. ती कुठल्याही परिस्थितीतल्या माणसाला असू शकते. त्यात चूक-बरोबर असे काही नाही. मानसोपचाराची गरज भासणे हे दुबळेपणाचा लक्षण नसून जागरूक होण्याचे लक्षण आहे, हे लक्षात घेतले तर नि:संकोचपणे मदत घेता येईल.


आता मानसोपचार म्हणजे नेमकं काय, कशी असते ही प्रक्रिया, त्याचा खरंच फायदा होतो कां , आपले प्रश्न आपण सोडवू शकत नसू तर तिसरा माणूस कसा काय सोडवू शकेल, त्याने कुणाला सांगितलं तर, ह्या समुपदेशनाच्या सेशन्सला खूप वेळ लागतो, असे अनेक प्रश्न, शंका आपल्या मनात असतात. मानसोपचाराची प्रक्रिया ही व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे लक्षात घेऊन विचारप्रक्रियेवर, भावनांवर, आणि वर्तनावर काम करून, नवीन adaptive coping mechanisms शिकण्यासाठी मदत करते. मानसशात्रज्ञ तुम्हाला तुमच्या भावनांचे नियमन, व्यवस्थापन करायला शिकवतात. You learn to express your emotions constructively. मुख्य म्हणजे , तुम्ही दिलेली माहिती ही गुपित ठेवल्या जाते . मानसशात्रज्ञांनी ह्या समस्यांचा, त्याकडे सहानुभूतीपूर्वक पण तटस्थपणे कसे बघायचे ह्याचा अभ्यास केलेला असतो. आपण आपल्याच समस्येकडे ह्या पद्धतीने अनेकदा बघू शकत नसल्यामुळे प्रयत्नांना दिशा मिळत नाही आणि प्रश्न सुटत नाही. आता हे सगळं जितकं खोल असेल, वेळही तितकाच लागणार. जशी झाडाची पाळंमुळं जितकी खोल रुजलेली असतील तेव्हडी ती खणून काढायला वेळ लागणार. पण ह्या सेशन मध्ये शिकलेल्या सर्व गोष्टी जर अमलात आणल्यात तर निश्चितच फायदा होतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. ह्या समुपदेशनाच्या प्रक्रियेत अनेक अडचणी, शंका येतात, एखादी गोष्ट अमलात कशी आणायची ते कळत नाही, चुका होतात. अशा वेळी तुमच्या थेरपिस्ट ला ह्या शंका मोकळेपणाने विचाराव्यात म्हणजे मार्ग सोपा आणि योग्य होईल. मानसोपचार, समुपदेशन ह्याचे मुख्य उद्दिष्ट हे व्यक्तीला insight देणे आणि त्याची समस्या हाताळण्याची क्षमता, शक्ती वाढवणे हे आहे.फक्त शेअर करण्यासाठी ही एक पर्यायी जागा नाही, हे लक्षात घ्यावे (share करायला कुणी नाही, म्हणून समुपदेशकाची गरज पडते, हा समज चुकीचा आहे. त्यासाठी अनेक माणसे जोडावीच लागतात). थोडक्यात असे की , मानसोपचार हे केवळ feel good , feel better यासाठी नसून getting better and staying better यासाठी आहे. त्यामुळे जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण असे ठरवूयात की, “माझे मानसिक स्वास्थ्य सगळ्यात महत्वाचे आहे आणि मी त्याची काळजी सर्वप्रकारे घेईन तसेच गरज भासेल तेव्हा नि:संकोचपणे मानसोपचाराची मदत घेईन”.


सौ. वैष्णवी आशिष कुलकर्णी.

मानसशास्त्रज्ञ, विदुला सायकॉलॉजिकल कन्सल्टन्सी, पुणे

 
 
 

Comments


Vidula Psychological Consultancy, Pune
4/41, Parag bungalow, 
Near PNG erandawane shop, and Sahakar baug,
Prakash lagu motiwale path,
behind SBI off karve road,
Erandwane, Pune -411004.

© 2025 by Vidula Psychological Consultancy, Pune

 

bottom of page