top of page
Search

समानता स्व-प्रेमाची

  • Writer: vidula consultancy
    vidula consultancy
  • Mar 9, 2020
  • 2 min read

ree


नमस्कार मैत्रिणींनो, आज जागतिक महिलादिन. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही शुभेच्छांचा वर्षाव आपल्यावर होईल. आपल्याबद्दल, आपल्या क्षमतांबद्दल, आपण सगळ्यांसाठी जे करतो त्याबद्दल सगळे अगदी भरभरून, मनापासून बोलतील, कृतज्ञता व्यक्त करतील. हे सगळं ऐकून, बघून आपलाही दिवस छान जाईल. पण ह्या सगळ्याचा परिणाम आपण स्वतःबद्दल काय विचार करतोय, स्वतःला किती प्राधान्य देतोय, स्वतःची किती काळजी घेतोय, स्वतःवर किती प्रेम करतोय ह्यावर खरंच होतो कां? अगदी मनापासून विचार करा. बऱ्याच जणींचं उत्तर 'नाही' येईल. असे कां?, ह्याचा आपण विचार केला पाहिजे.


दोन मैत्रिणी खूप वर्षांनी एकमेकींसमोर येतात. ऋचा प्रियाला विचारते, " अगं प्रिया, इतक्यात नवीन काय लिहिलंस, कॉलेजात असताना काय सुंदर लिहायचीस तू ". प्रिया- काहीच नाही गं. नोकरी, घर, मुलांचा अभ्यास, नवऱ्याचा ऑफीस ह्या सगळ्यात लिहायला, वाचायला वेळच मिळत नाही. " हा संवाद खूप ऐकल्यासारखं वाटतोय नां? कां ह्यातल्या प्रियासारखीच अवस्था आपलीही आहे?, याचा विचार व्हाल पाहिजे.


यंदाच्या जागतिक महिला दिनाची मध्यवर्ती संकल्पना " समानतेसाठी सारे" ही आहे. समानता (मुख्यतः स्त्री- पुरुष) कुठे आणि कशी असावी, ह्याबाबत बरीच चर्चा होत असते आणि त्यादृष्टीने पाऊलेदेखील उचलली जातात. उदा- सामान हक्क- शिक्षण, समन हक्क- संपत्ती, समान हक्क- करिअर , इ. मी आज एका वेगळ्या आणि महत्वाच्या समानतेविषयी बोलणार आहे- " समानतेने काळजी घेणे".


आपण स्त्री म्हणून इतरांची जशी काळजी घेतो, तशीच काळजी स्वतःची घेतो कां? , इतरांना काय हवे नको ते बघतो, त्यांच्या आवडीनिवडी जपतो, त्यांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी स्पेस देतो, खाण्यापिण्याची, तब्येतीची काळजी घेतो, तशी स्वतःची काळजी घेतो कां? की त्यासाठी आपण इतरांवर अवलंबून राहतो आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर कुढत बसतो? समानता इथेही असायला हवी. स्वतःची काळजी घेणे हि आपली गरज आणि अधिकार आहे. इतरांसाठी जे जे करतो ते ते समान न्यायाने स्वतःसाठीही केले पाहिजे.


कधीतरी स्वतःचे हट्टा पुरवायला पाहिजे. आपल्या गरज काय आहेत ते ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी कुणावरतरी अवलंबून राहण्यापेक्षा आपणच कष्ट घ्यायला पाहिजे. तर स्त्री सक्षम होऊ शकेल. दुर्दैवाने स्वतःकडे दुर्लक्ष करणे, स्वतःला प्राधान्य न देणे किंवा इतरांसाठी सगळं करून वेळ मिळालाच तर स्वतःसाठी जगणे अशा गोष्टींना नकळतपणे प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे " मला इतकं काम होतं की जेवायलाच वेळ मिळाला नाही, कपभर कॉफी पिऊन निघाले आणि कामाला लागले, सगळ्यांचा डबा तयार करण्यातच उशीर इतका उशीर होतो, माझा डबा भरायला वेळच मिळत नाही", यासारखी अनेक वाक्य स्त्रिया अगदी कौतुकाने आणि अभिमानाने (सुप्त) बोलत असतात. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की, स्वतःकडे दुर्लक्ष करणेच जणू योग्य असा काहीसा समाज आपला होतो आणि जे अतिशय हानिकारक आहे.


स्वतःची काळजी कशी घेता येईल? थोडा विचार करूयात. आपण स्वतःच्या भावनांकडे, विचारांकडे डोळसपणे बघणे, स्वतःचे मत निःसंकोचपणे मांडणे, स्वतःला प्राधान्य देणे, स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे, नियमित व्यायाम करणे, कामाच्या ठिकाणी वेळेत पोचून वेळेत काम संपविणे, पुरेशी झोप, विश्रांती घेणे,



आपल्याला आवडेल अशी एक तरी गोष्ट रोज स्वतःसाठी करणे, छंद जोपासणे, जवळच्या लोकांना भेटणे अशा अनेक पद्धतीने स्वतःची काळजी घेणे शक्य आहे.

तर यावर्षीच्या महिला दिनी आपण असे ठरवूयात की इतरांप्रमाणे (समानतेने) मी स्वतःकडे लक्ष देईन, स्वतःची काळजी घेईन, आणि त्याबद्दल अपराधी वाटून घेणार नाही.


सौ. वैष्णवी आशिष कुलकर्णी.

मानसशास्त्रज्ञ, विदुला सायकॉलॉजिकल कन्सल्टन्सी, पुणे


 
 
 

Comments


Vidula Psychological Consultancy, Pune
4/41, Parag bungalow, 
Near PNG erandawane shop, and Sahakar baug,
Prakash lagu motiwale path,
behind SBI off karve road,
Erandwane, Pune -411004.

© 2025 by Vidula Psychological Consultancy, Pune

 

bottom of page